पालघर नगर परिषद निवडणूक कामाचा जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी घेतला आढावा

4

पालघर, दि. 15- पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत गुरूवारी उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात आली असून 24 मार्च रोजी मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज शुक्रवारी निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक कामांचा आढावा घेतला.

पालघर येथे नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार आणि प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार निवडून देण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. याबाबत मतदारांबरोबरच राजकीय पक्षांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी केली. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांमधून होणारा प्रचार, पेड न्यूज, निवडणूक खर्चावर नियंत्रणासाठी देखरेख, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम बाबतचे प्रशिक्षण आदींबाबतचा आढावा घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक श्रीधर डुबे पाटील यावेळी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवडणूक कार्याचे सादरीकरण केले. सहायक निवडणूक अधिकारी महेश सागर, प्रशांत ठोंबरे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.